प्रस्तुत पुस्तक स्वामी विवेकानंदकृत ‘Religion of Love’ नामक इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद होय. ज्या व्याख्यानांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे, त्यांपैकी काही व्याख्याने स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील संयुक्त संस्थानात दिली होती, तर काही इंग्लंडमधे दिली होती. भक्तीचा व ईश्वरप्रेमाचा खरा अर्थ काय आहे, खर्या भक्ताचे जीवन कोणत्या प्रकारचे असते, ईश्वरप्रेमाच्या मार्गात प्रगती होण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे इत्यादी महत्त्वपूर्ण विषयांवर स्वामीजींनी या व्याख्यानांत प्रकाश पाडला आहे. ईश्वरप्रेम म्हणजे निव्वळ भावनाविवशता नसून ते उत्कट व चिरस्थायी होण्यासाठी कोणते उपाय योजिले पाहिजेत याचे स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात मूलग्राही विवेेचन केले आहे. त्याबरोबर भक्तिमार्गातील खाचखळगे कोणते आहेत व सावधगिरी राखून ते कसे टाळता येतात याचेही उपयुक्त दिग्दर्शन स्वामीजींनी आपल्या या व्याख्यानांमधे केले आहे.