आंद्रा आणि तातियाना या अनुक्रमे ४ आणि ६ वर्षांच्या इटालियन बहिणी त्यांच्या रिजेका येथील राहत्या घरातून ऑस्टवीच येथील नाझिंच्या बर्कानौ छळछावणीत नेल्या जातात. सुमारे दोन लाख तीस हजार मुलांतून अवघी काही डझन मुलं तिथून जीवंत परत येतात. या बहिणी त्या भाग्यवान मुलांपैकी एक ठरतात आणि वयाची सत्तरी उलटल्यानंतर त्या सगळ्या अमानुष आठवणी आत्ताच्या जगासोबत वाटून घ्यायला लागतात. `वी लिटल गर्ल्स इन ऑस्टवीच` हे पुस्तक लिहितात. नाझिंच्या विरोधात धाडसाने साक्षी देतात. २०१९ मध्ये हे पुस्तक इटली भाषेत प्रसिद्ध झालं. जर्मनी, इंग्रजी बरोबरीने आता हे पुस्तक मराठीत येत आहे. हे पुस्तक म्हणजे दोन लहानग्या बहिणींच्या छळछावणीतील आठवणी आहेत. डोळ्यासमोर पाहिलेले अनंत मृत्यू आहेत, बचावून परत आल्याचा प्रसंग आहे, छळछावणीच्या अनुभवाचे व्रण घेऊन पुढे जगत राहणं आहे. टोकाच्या वंशद्वेषातून जन्माला आलेल्या अमानुषतेचे निरागस बहिणींच्या दृष्टिकोनातून केले गेलेले हे वर्णन आहे.