एन.एस.ए. या संस्थेने एका महासंगणकाच्या साहाय्याने कोणत्याही गुप्त मजकुराचा भेद करून उलगडा करणारी यंत्रणा निर्माण केली. एका गूढमजकुराचा भेद मात्र त्यांच्या महासंगणकाला करता येईना. पाच मिनिटात होणारे त्याचे काम दिवस उलटून गेला तरी संपेना. ह्या संस्थेत सुसान नावाची एक सुंदर गणितज्ञ स्त्री होती. तिला त्या वेळी जे सत्य सापडले ते हादरवणारे होते; सत्तेच्या महामार्गावर भूकंप घडवणारे होते. एन.एस.ए. संस्थेला ओलीस धरले गेले होते. बॉम्बने नव्हे, शस्त्रांनी नव्हे, तर फक्त एका अगम्य अशा सॉफ्टवेअरच्या कार्यक्रमाने ओलीस धरलेले होते. सुसान संस्था वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होती. सारे अमेरिका राष्ट्र पांगळे होण्याची वेळ जवळ येत चालली होती. शेवटी तिलाच आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत पळापळ करावी लागली. तिची सर्व बाजूंनी फसवणूक झाली होती. तिला आपल्या प्रियकराची काळजी वाटू लागल्याने ती बेभान झाली होती.शेवटची लढाई कमालीची रोमहर्षक ठरली.