दोन युगप्रवर्तक महापुरुष- शिवाजी महाराज व तुकाराम महाराज एकमेकांना भेटले होते. एकाला हिंदवी साम्राज्य उभं करायचं होतं, तर दुसऱ्याला भक्तीचं साम्राज्य. एकाकडं शौर्य होतं तर दुसऱ्याकडे शब्द. एकासोबत जिजाई होती तर दुसऱ्या सोबत विठाई. एकाचं शस्त्र हेच शब्द होते, तर दुसऱ्याचे शब्द हेच शस्त्र होतं. एक निश्चयाचा महामेरू होता तर दुसरा भक्तीचा अवतारू. कितीतरी वेळ राजे तुकोबांच्या मिठीत होते आणि भवताली उभे असणारे सगळे जण या दोघांच्या भेटीचा तो कौतुक सोहळा पाहत होते.