माणसानं दृष्टी गमावली की तो अन्तर्मनाने जग पाहू लागतो. वि. स. खांडेकरांचंही असंच झालं. सन १९७३ ला त्यांची दृष्टी गेली. तरी ते लिहीत राहिले. ‘मुखवटे’मधील निबंध याच काळातील. ‘साप्ताहिक स्वराज्य’मध्ये लिहिलेले हे निबंध म्हणजे एका संवेदनाशील मनानी माणसाच्या जीवनाचा घेतलेला धांडोळाच! या धांडोळ्यातून ते गतकाळाचा ताळेबंदच मांडतात. त्यांच्या लक्षात येतं की जग हा एक मुखवट्यांचा बाजार आहे. मुखडे नि मुखवट्यांची ही तर बंदिशी! ‘मुखवटे’ लघुनिबंध संग्रह म्हणजे माणसाच्या खNया-खोट्या प्रतिमा दाखविणारा आगळा आरसाच! वाचक यात स्वत:स डोकावून पाहील तर त्यास आपला मुखडा दिसेल आणि ‘मुखवटे’ही!