तसे पाहिले, तर अगदी सर्वसाधारण माणसाच्या व्यक्तिमत्त्वालाही असंख्य पैलू असतात. मग शाहूंसारख्या क्रियाशील राजाच्या व्यक्तिमत्त्वाला विविध पैलू होते, यात आश्चर्य नाही. वसुधा पवार यांनी आपल्या पुस्तकाच्या वेगवेगळ्या प्रकरणांतून या पैलूंचे दर्शन घडविले आहे. अस्पृश्यतानिवारण, सक्तीचे प्राथमिक शिक्षण, वसतिगृहांची स्थापना, दुष्काळावर आणि साथीच्या रोगांवर केलेली मात, आरक्षण, मुलींचे शिक्षण, आंतरजातीय विवाहास मान्यता देण्याचा कायदा, फासेपारधी वगैरेंचे पुनर्वसन, जलसंधारण, चहा-कॉफी लागवड इ. प्रकारे सामाजिक जीवनाच्या असंख्य क्षेत्रांमध्ये ‘राजर्षी शाहूंनी’ काळाच्या पुढे पावले टाकली असे दिसते. काळ राजाला घडवतो की राजा काळाला घडवतो, याचे ‘राजा कालस्य कारणम्’ हे प्राचीन काळी देण्यात आलेले उत्तर भारताच्या इतिहासातील ज्या मोजक्या राजांना यथार्थतेने लागू पडते, त्यांमध्ये शाहू महाराजांचे स्थान फार वरचे आहे, यात शंका नाही. वसुधा पवार यांच्या प्रस्तुत पुस्तकातून हे सर्व उत्तम रीतीने व्यक्त झाले आहे.