व.कृ.जोशी यांच्या कथांचे वैशिष्ट्य हे की त्या केवळ वास्तववादी नाहीत तर सत्यघटनांवर आधारित आहेत.त्यामुळे सत्य हे कल्पनेपेक्षाही चमत्कृतीपूर्ण असते,याचा प्रत्यय वाचकांना या कथांमधून मिळतो. मराठी साहित्यात आजवर पोलिसांची प्रतिमा ही हास्यास्पद अगर विकृत अशीच दाखवली गेली आहे. पण गुन्ह्याचा तपास ही कायदेशीर तशीच सामाजिक जबाबदारी आहे. ही पार पाडणारा कार्यनिष्ठ आणि नीतिमानच असावा लागतो. अशा अधिकाऱ्याची प्रतिमा या कथांद्वारे मराठी वाचकांसमोर आली आहे हे निर्विवाद आहे.