स्वामी विवेकानंदांची या विषयावरील मराठीमध्ये आतापर्यंत दोन पुस्तके उपलब्ध आहेत. पहिले ‘भक्तियोग’ व दुसरे ‘प्रेमयोग’. या दोन्ही पुस्तकांत स्वामीजींचे भक्तीविषयक निवडक विचार वाचावयास मिळतात. याव्यतिरिक्त त्यांच्या ग्रंथावलीमध्ये या विषयावर आणखी काही जे स्फुट विचार उपलब्ध आहेत ते प्रस्तुत पुस्तकात एकत्रित करण्यात आले आहेत. देश-विदेशात स्वामी विवेकानंदांनी भक्ती, भक्तियोग, ईश्वर-प्रेम या विषयांवर विविध ठिकाणी व्याख्याने दिली होती. त्यांतील अनेक व्याख्यानांचा सारांश तसेच वर्तमानपत्रांमध्ये आलेला अहवाल व टिपणे यांना यात समाविष्ट करण्यात आलेले आहे. स्वामीजींनी ही व्याख्याने विविध स्थानी व विविध श्रोत्यांसमोर दिलेली असल्यामुळे प्रस्तुत पुस्तकामध्ये काही गोष्टींची पुनरावृत्ती झाल्याचे वाचकांना आढळेल. तथापि या विषयावरील चिंतन-मननासाठी ती आवश्यकच आहे.