‘भाऊबीज’ वि. स. खांडेकरांच्या कथालेखनाच्या पहिल्या दशकातील असंकलित राहिलेल्या कथांचा संग्रह. यात खांडेकरांची सर्व प्रथम लिहिलेली परंतु अद्याप असंकलित राहिल्याने अपवादस्वरुप वाचली गेलेली ‘घर कोणाचे?’ कथा आहे. खांडेकर प्रारंभी कादंबरीची प्रकरणं शोभतील अशा विस्तृत कथा लिहित. त्यातील त्याकाळची (१९१९ ते १९२९) भाषा, भावविश्व, समाज जीवन आज वाचताना मोठं मोहक वाटलं नाही तरच नवल! विसाव्या शतकाच्या प्रारंभीचा मनुष्य, त्याचं जीवन, समस्या, रीतीभाती कशा होत्या हे ‘भाऊबीज’मधील भावप्रवण कथा वाचताना उमजतं खांडेकरांच्या कथालेखनाच्या उमेदवारीच्या कालखंडातील या कथातील जीवन उभारी खरोखरच विलक्षण! विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या कथा एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रकाशित होताना वाचणे यास स्वत:चे असे एक अभ्यास मूल्य आहे खरे!