स्वामीजींनी भारतात आणि परदेशात दिलेल्या व्याख्यानांत, शिष्यांशी त्यांची जी संभाषणे झाली त्यात आणि त्यांच्या लिखाणांत हे विचार अभिव्यक्त झाले आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे आणि ज्ञान, भक्ती, कर्म व योग या सार्यांचा सर्वोच्च आविष्कार त्यांच्या जीवनात कसा दिसून येतो याचे स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात केलेले विवरण मौलिक स्वरूपाचे आहे. मेंदू, हृदय व हात यांच्या शक्तीचा विकास कसा करून घ्यावा आणि या विकासाच्या साहाय्याने मोक्षाची वा पूर्णत्वाची प्राप्ती कशी करून घ्यावी यासंबंधीची शिकवण भगवंतांनी गीतेत दिली आहे. स्वामी विवेकानंदांनी गीतेच्या या समन्वयात्मक शिकवणुकीवर अचूक बोट ठेवले आहे आणि गीतेतील शक्तिदायी व जीवनदायी उपदेश भारताच्या सद्य:स्थितीत किती आवश्यक आहेत याचे त्यांनी सुंदर दिग्दर्शन केले आहे. अनासक्ती हा भगवान श्रीकृष्णांच्या जीवनातील केंद्रीय भाव असून या भावाने युक्त होऊन ईश्वरार्पण बुद्धीने खरे लोकहित कसे साधावे याविषयीची त्यांची शिकवण खरोखरच अमोल आहे. स्वामी विवेकानंदांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने श्रीकृष्णांचे जे सर्वांगपरिपूर्ण जीवनचित्र रेखीव आणि वेधक शब्दांत सर्वांसमोर उभे केले आहे त्याचा सखोल प्रभाव मनावर पडल्यावाचून राहत नाही. जीवनाच्या विभिन्न क्षेत्रांत कार्य करणार्या व्यक्तींना प्रस्तुत पुस्तकात प्रकट झालेल्या विधायक विचारांपासून खचित मार्गदर्शन लाभेल.