‘सुबोध राजयोग’ हे आमचे नवीन प्रकाशन प्रसिद्ध करताना आम्हाला आनंद होत आहे. अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंद आपल्या काही शिष्यांसह श्रीमती सारा सी. बुल यांच्या निवासस्थानी राहिले होते. त्या वेळी त्यांनी योगसाधनेवर जी छोटी भाषणे दिली ती श्रीमती बुल यांनी लिहून घेतली. त्यानंतर 1913 साली काही अमेरिकानिवासी मित्रांनी इतरांनाही या भाषणांचा लाभ व्हावा म्हणून ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. या भाषणात स्वामी विवेकानंदांनी थोडक्यात राजयोगाचे सार सांगितले आहे. प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी इत्यादी विषयांचे सुबोध भाषेत विवरण करून, राजयोग हा आत्मज्ञानाचे अंतिम ध्येय प्राप्त करून घेण्यासाठी कसा उपयुक्त आहे हे स्वामी विवेकानंदांनी या भाषणात स्पष्ट केले आहे. या भाषणांवरून राजयोगाच्या विभिन्न साधनांचे स्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभे राहते व आदर्श जीवन घडविण्याच्या दृष्टीने राजयोग कसा उपयुक्त आहे हे प्रत्ययास येते.