ज्या देशात स्त्रियांना योग्य सन्मान मिळतो आणि त्यांच्या सर्वांगीण विकासास अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यात येते तोच देश उन्नतावस्थेस पोहोचत असतो. स्वामी विवेकानंदांनी हे सत्य पुरेपूर ओळखले होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या अनेक व्याख्यानांतून आणि लेखनांतून भारतीय स्त्री ही आदर्श स्त्री कशी होऊ शकेल याचे मनोज्ञ आणि मर्मग्राही विवेचन केले आहे. भारतीय स्त्रीचे कुटुंबातील व समाजातील स्थान कोणते आहे, तिने आपल्यासमोर कोणती ध्येये ठेवावीत, भारतीय स्त्री आणि पाश्चात्त्य स्त्री यांच्यामधे कोणता भेद आहे आणि भारतीय स्त्रियांसमोर कोणत्या समस्या आहेत व त्यांचे निराकरण करण्याचे उपाय कोणते आहेत या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे मूलग्राही विवरण स्वामीजींनी प्रस्तुत पुस्तकात केले आहे. चारित्र्य निर्माण करणार्या शिक्षणाबरोबरच स्त्रियांना धर्म, गृहव्यवस्था, कला, शिशुसंगोपन इत्यादी विषयांचे देखील शिक्षण द्यावयास हवे म्हणजे स्वत:चे प्रश्न स्वत:च्या मार्गाने सोडविण्यास त्या कशा समर्थ बनतील हे स्वामीजींनी आपल्याला ओजस्वी व हृदयस्पर्शी भाषेत या पुस्तकामधे समजावून सांगितले आहे. ह्या आवृत्तीत दोन नवीन लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. यांतील एक ‘भारतीय स्त्रिया’ असून दुसरा ‘भारतीय स्त्री — कालची, आजची आणि उद्याची’ हा होय. ‘भारतीय स्त्रिया’ या लेखाचा अनुवाद स्वामी पीतांबरानंद व ‘भारतीय स्त्री — कालची, आजची आणि उद्याची’ या लेखाचा अनुवाद प्रा. प्र. ग. सहस्रबुद्धे, खामगाव यांनी केला आहे. आम्ही या दोघांचेही अत्यंत आभारी आहोत. भारतातील स्त्रियांचे जीवन सर्व दृष्टींनी उन्नत बनविणे हे आपले प्रधान कर्तव्य आहे आणि ते जर आपण योग्य रीतीने पार पाडले तर आपल्या देशाचे भवितव्य खचित उज्ज्वल होईल.