स्वामी विवेकानंदांचा सर्वसाधारणतः आपल्याला परिचय आहे – त्यांच्या व्याख्यानांतून, त्यांच्या लिखाणांतून, आणि त्यांच्या जनसेवेच्या कार्यांतून. प्रस्तुत पुस्तकाचे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य हे की, त्यात आपल्याला स्वामी विवेकानंदांचे दर्शन घडते – त्यांच्या वैयक्तिक सहवासातून. स्वामी विवेकानंदांचे एक शिष्य श्री. शरच्चंद्र चक्रवर्ती यांना स्वामीजींच्या निकट सहवासाचे भाग्य लाभले होते. नाना प्रसंगी स्वामी विवेकानंदांशी त्यांची जी संभाषणे होत ती त्यांनी “स्वामीशिष्य-संवाद” नामक बंगाली पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्ध केली होती. प्रा. वि. शं. बेनोडेकर, एम्.ए. यांनी मूळ बंगालीतून त्याचा केलेला अनुवाद “स्वामी विवेकानंदांच्या सहवासात” या प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने वाचकांच्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे.वेदान्त तत्त्वज्ञान, ध्यान-जप, साधना, मुक्ती इत्यादी आध्यात्मिक विषयांसंबंधीच नव्हत, तर, भारताचे पुनरुत्थान, समाजसुधारणा, नीति, शिक्षण, स्त्री-जीवन, कला, संगीत इत्यादी विभिन्न जीवन-क्षेत्रातील नाना महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या मुद्यांवरील युगाचार्य स्वामी विवेकानंदांचे असंदिग्ध, ऊर्जस्वल आणि स्फूर्तिदायी सिद्धांत या ग्रंथात वाचावयास मिळतात.
प्रत्येक अध्यायाच्या शिरोभागी त्या त्या अध्यायातील विवेचनाचे मुख्य मुद्दे देण्यात आल्यामुळे वाचन अधिक सोयीचे आणि आनंददायक होईल अशी आशा आहे.