ज्या जीवनात ज्ञान, भक्ती व कर्म यांचा परमोच्च विकास झालेला दिसून येतो, जे जीवन पावित्र्याचे व कामगंधहीन प्रेमाचे मूर्तिमंत प्रतीक आहे आणि ज्या जीवनात नाना मतांच्या व नाना धर्मांच्या साधनांचे अनुष्ठान होऊन त्या त्या साधनांचे अंतिम लक्ष्य हस्तगत झालेले आहे, अशा सर्वांगपरिपूर्ण जीवनाचे सांगोपांग वर्णन आणि विश्लेषण त्यांच्याच एका अधिकारी अंतरंगीच्या शिष्याने – श्रीमत् स्वामी सारदानंदांनी – ‘श्रीरामकृष्णलीलाप्रसंग’ या ग्रंथात केले आहे. स्वामी सारदानंदजी हे श्रीरामकृष्ण-संघाच्या स्थापनेपासूनच त्याचे सचिव (सेक्रेटरी) होते आणि आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत (इ. स. १९२७ पर्यंत) त्यांनी हे महत्त्वाचे पद विभूषित केले. त्यांनी बंगालीत लिहिलेल्या या चरित्रग्रंथात अन्य चरित्रांमध्ये न आढळणाऱ्या कितीतरी नवीन घटनांचा व गोष्टींचा समावेश आहे. म्हणूनच उपलब्ध असलेल्या श्रीरामकृष्णांच्या सर्व चरित्रांमध्ये ‘श्रीरामकृष्णलीलाप्रसंग’ हा चरित्रग्रंथ केवळ अधिक विस्तृतच नव्हे, तर अधिक अधिकृत व अधिक विश्लेषणात्मक आहे. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे भगवान रामकृष्णांच्या जीवनाचे नुसते वर्णनच नसून त्यात भारतातील व भारताबाहेरील विभिन्न संप्रदायांच्या व धर्मार्ंच्या तत्त्वज्ञानांचेही सविस्तर वर्णन व विश्लेषण आहे. या दृष्टीने प्रस्तुत ग्रंथ म्हणजे धर्म व तत्त्वज्ञान यांचा जणू विशाल कोशच आहे असे आपल्याला म्हणता येईल.