भगवान श्रीरामकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार दुश्चर साधना करीत असता स्वामी विवेकानंदांना श्रीरामकृष्णांच्या कृपाकटाक्षाने निर्विकल्प समाधीद्वारा जगातील आणि जीवनातील अंतिम सत्याचा साक्षात्कार झाला. त्यानंतर त्यांनी यथाकाल समग्र भारतात आणि जगाच्या बऱ्याचशा भागात सुबुद्ध संचार केला. अशा रीतीने ईश्वराची आणि माणसाची प्रत्यक्ष ओळख करून घेऊन, भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात युगोपयोगी स्वरूपात साकारलेल्या सनातन सत्याच्या अनुरोधाने स्वामी विवेकानंदांनी भारताला आणि समस्त जगाला प्रदान केलेल्या अखिल जीवनस्पर्शी संदेशाचा संपूर्ण, अधिकृत मराठी अनुवाद या ऐतिहासिक पुण्यप्रसंगी वाचकांच्या हाती देताना कृतकृत्यता वाटत आहे. स्वामी विवेकानंदांच्या तहत आजपर्यंत प्रकाशित झालेल्या, आणि त्याचबरोबर अगदी नव्याने उपलब्ध झालेल्या व अद्याप कोणत्याही भाषेत अप्रकाशित अशा सर्व व्याख्यानांचा, प्रवचनांचा, ग्रंथांचा, लेखांचा, पत्रांचा, संवाद-संभाषणांचा, मुलाखतींचा, प्रश्नोत्तरांचा, कवितांचा व इतर सर्व प्रकारच्या साहित्याचा मूळ इंग्रजीतून आणि बंगालीतून केलेला अनुवाद प्रस्तुत “ग्रंथावली”च्या एकूण दहा खंडांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. स्वामी विवेकानंदांच्या आजपर्यंत उपलब्ध झालेल्या समस्त इंग्रजी व बंगाली साहित्याचा हा प्रथमच प्रसिद्ध होत असलेला अधिकृत मराठी अनुवाद होय.आधुनिक विज्ञान, तज्जनित तांत्रिक प्रगती, औद्योगिक क्रांती प्रभृतींनी जन्म दिलेल्या भौतिक दृष्ट्या समृद्ध, ऐहिक सुखसोयींनी युक्त, परंतु आत्महीन, जडवादी, भोगैकसर्वस्व ‘आधुनिकते’ने भारताच्या आणि जगाच्या जीवनात जी अपूरणीय आध्यात्मिक पोकळी निर्माण केली आहे ती ह्याच संदेशाने – ह्याच अभ्युदय आणि निःश्रेयस-साधक युगधर्माने भरून निघणार आहे हे त्याचे अनुशीलन केल्यास पटल्याखेरीज राहणार नाही. त्याचबरोबर त्याने शिक्षण, समाजजीवन, राजनीती प्रभृती जीवनाच्या महत्त्वाच्या शाखा निकोप व पुष्ट होऊन व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि समस्त जग ह्यांच्या स्थैर्यासाठी भरभक्कम पाया लाभेल.
भगवान श्रीरामकृष्णांचे प्रधान शिष्य स्वामी विवेकानंद हे आधुनिक मानवाचे यथार्थ प्रतिनिधी होते. आधुनिक विचारप्रवाह आणि त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्या, प्रश्न आणि आकांक्षा यांच्याशी त्यांचा प्रत्यक्ष परिचय होता. ह्या सर्व आधुनिक समस्यांना आणि प्रश्नांना चिरंतन सत्याच्या अनुरोधाने स्वामी विवेकानंदांनी आधुनिक मानवाला उमजतील व पटतील अशा स्वरूपात समर्पक आणि निर्णायक उत्तरे दिली आहेत.