विश्ववरेण्य स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांपैकी अधिकांश त्यांची व्याख्यानेच आहेत, लिखाणाचा भाग त्या मानाने कमीच. प्रस्तुत प्रबंध त्यांच्या लिखाणांपैकी एक होय. ते अमेरिकेला गेल्यानंतर सुमारे एक वर्षाने मद्रासमधे एक मोठी सभा भरविण्यात आली होती. स्वामीजींच्या हिंदुधर्म-प्रचारातील अद्भुत सफलतेबद्दल आनंद प्रकट करून, त्या सभेतर्फे त्यांना एक अभिनंदनपत्र पाठविण्यात आले. त्याच्या उत्तरादाखल स्वामीजींनी जे पत्र धाडले तेच ह्या छोट्याशा पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर ठेवण्यात येत आहे. स्वामीजींनी त्यांत, प्राचीन व अर्वाचीन शास्त्रांचे आणि संप्रदायांचे थोडक्यात विश्लेषण करून हिंदुधर्माच्या खर्या स्वरूपाचे दिग्दर्शन केले असून भारतवासी तरुणांना त्या सनातन धर्माचा प्रचार करण्यास्तव सर्वस्वत्यागाचे महान् व्रत घेण्यासाठी आपल्या ओजस्वी वाणीने उत्साहित केले आहे.