स्वातंत्र्योत्तर काळातील पन्नास वर्षांत ग्रामजीवन आणि ग्रामसंस्कृती यांच्यात मूलगामी स्थित्यंतरे झाली. त्यांतून स्वातंत्र्यपूर्वकाळातील खेडे जवळजवळ नष्ट झाले. त्याचे फार थोडे अवशेष महाराष्ट्राच्या पार आंतरिक भागात, डोंगर-कपारींच्या आदिवासी मुलखात शिल्लक राहिले. महाराष्ट्राच्या या बदलत्या खेड्याचे एकूणच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्राकृतिक, सांस्कृतिक अंतरंग प्रस्तुत ग्रंथात उकलून दाखविण्याचा आनंद यादवांनी प्रयत्न केला आहे. आनंद यादव या नवयुगसदृश स्थित्यंतराचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे बदलते खेडे प्रत्यक्ष अनुभवल्याचा प्रत्यय या ग्रंथात पानोपानी येतो.मराठी विचारवंत, सुधारक, साहित्यिक, प्राध्यापक, कार्यकर्ते, संस्कृति-उपासक, चळवळकर्ती तरुण पिढी, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि जाणकार वाचक या सर्वांनाच मार्गदर्शक व प्रेरक ठरेल अशा योग्यतेचा हा पहिलाच मराठी ग्रंथ आहे.