प्रस्तुत पुस्तकात श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत या सुप्रसिद्ध ग्रंथांतील भगवान श्रीकृष्णांची अत्युत्कृष्ट अमर वचने काळजीपूर्वक निवडून आणि त्यांचे विभिन्न विषयांनुसार वर्गीकरण करून ती सादर करण्यात आली आहेत. तसेच भगवान श्रीकृष्णांचे संक्षिप्त चरित्र आणि स्वामी विवेकानंदांनी त्यांना वाहिलेली आदरांजलीही पुस्तकाच्या प्रारंभी समाविष्ट केली आहे. भगवान श्रीकृष्णांची अमृतवाणी हजारो वर्षांपूर्वी प्रकट झाली, पण आजही ती तितकीच सुंदर, मनोज्ञ आणि स्फूर्तिकारक आहे. इतका काळ लोटल्यावरही तिचा नवनवोन्मेष अथवा तिची टवटवीतपणा लेशमात्रही कमी झाली नाही. भगवंताची ही वचने म्हणजे शांतीची आणि आनंदाची अक्षय निधानेच होत. असंख्य मुमुक्षूंना ती दीपस्तंभवत् उपकारक ठरली आहेत.