’मी का नाही?’ हा प्रश्न विचारू धजणाऱ्या तृतीयपंथी समाजाची ही कहाणी! या कादंबरीची नायिका असलेल्या नाझच्या वाट्यालाही हे दु:ख येते. पण तिचे वडील सोडून सगळे कुटुंब, विशेषत: तिची आई तिला भक्कम पाठबळ देते.
या पाठबळाच्या जोरावर नाझ ’हिजडा समाज’ स्थापन करते. यातून ती या समाजाला स्वावलंबी आणि सुसंघटित तर करतेच; पण प्रसंगी कठोर भूमिका घेऊन त्यांचे प्रश्नही सोडवते. हिजडा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी एक चळवळ उभारते. समाजात पदोपदी होणारा अपमान, टिंगलटवाळी यांना दाद न देता निर्भीडपणे स्वत:च्या प्रश्नांसाठी न्यायालयापर्यंत धडक मारते. ’मी का नाही’ हा एक शोध आहे. तो किती भेदक आहे, हे कादंबरी वाचताना उमगत जाते. त्याचे उत्तर शोधताना वाचक अस्वस्थ तर होतोच; पण निरुत्तरही होतो!