प्रस्तुत पुस्तक ‘विथ द स्वामीज इन अमेरिका’( With the Swamis in America) या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. लेखक स्वामी अतुलानंद उर्फ गुरुदास महाराज हे रामकृष्ण संघाचे एक पाश्चात्त्य संन्यासी होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मि. कॉर्लेनियस जे. हीज्ब्लॉम (Mr. Corlenius J. Heijblom) असून हॉलंडमधील ॲमस्टरडॅम येथे ७ फेब्रुवारी १८७० रोजी त्यांचा जन्म झाला. १८९८ साली उन्हाळ्यात न्यूयॉर्कमध्ये विमा कंपनीत नोकरी करीत असताना अठ्ठावीस वर्षांच्या कॉर्लेनियसना प्रथमच वेदान्त व स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल काही ऐकायला मिळाले. लवकरच एके रविवारी त्यांना स्वामी अभेदानंदांचे भाषण ऐकायची संधी मिळाली व त्यांच्याशी त्यांचा संपर्क स्थापित झाला. १ एप्रिल १८९९ रोजी त्यांना स्वामी अभेदानंदांनी ब्रह्मचर्यदीक्षा दिली व त्यांचे नाव ‘गुरुदास’ ठेवले. त्यानंतर लवकरच स्वामी विवेकानंद दुसऱ्यांदा अमेरिकेत आले असताना गुरुदास महाराजांना त्यांचे व त्यांच्यासोबत आलेल्या स्वामी तुरीयानंदांचे दर्शन घडले. स्वामी तुरीयानंद अमेरिकेत असेपर्यंत शांती आश्रमात त्यांच्या निकटच्या सहवासाचा व मार्गदर्शनाचा लाभ त्यांना मिळाला. स्वामी तुरीयानंदांनी ३ जून १९०२ रोजी भारताकडे प्रयाण केले तेव्हा गुरुदास महाराजांवरच शांती आश्रमाचा भार आला. तेथे काही काळ कठोर तपःसाधनेत कालक्रमणा केल्यानंतर ते १९०६ साली पहिल्यांदा भारतात आले. १९११ साली माताजी श्रीसारदादेवींकडून मंत्रदीक्षा लाभून ते धन्य झाले. १९१२ साली त्यांना प्रकृतिवैकल्यामुळे अमेरिकेत परतावे लागले. नंतर १९१४ साली ते दुसऱ्यांदा भारतात आले व १९१८ पर्यंत भारतात राहून अमेरिकेत परतले. १९२२ साली ते तिसऱ्यांदा भारतात आले ते कायमचेच. १८ फेब्रुवारी १९२३ या शुभदिनी त्यांना स्वामी अभेदानंदांकडून संन्यासदीक्षा व स्वामी अतुलानंद हे नाव मिळाले. ९ ऑगस्ट १९६६ या दिवशी शहाण्णव वर्षे वयाच्या या वयोवृद्ध नि ज्ञानवृद्ध संन्याशाने देह ठेवला. रामकृष्ण संघातून संन्यासदीक्षा घेऊन शेवटपर्यंत संघात राहणाऱ्या पाश्चात्त्य संन्याशांपैकी ते प्रथम होत.
स्वामी विवेकानंद ज्यांना ‘मूर्तिमंत वेदान्त’ म्हणत असत अशा स्वामी तुरीयानंदांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाखाली घडलेल्या स्वामी अतुलानंदांच्या जीवनात अत्युच्च अध्यात्मवैभवाचा विलोभनीय असा आविष्कार बघून पौर्वात्य व पाश्चात्त्य देशांतील अनेक साधकांना प्रेरणा मिळत असे. अशा एका तपःपूत अनुभूतिसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या लेखणीतून चितारलेली ही श्रीरामकृष्णशिष्यांची स्मृतिचित्रे वाचकांना एका उदात्त आध्यात्मिक राज्याचे दर्शन घडविण्यास नक्कीच समर्थ ठरतील असा आम्हाला विश्वास वाटतो.